आ. जयकुमार गोरे यांचा आरोप
माण-खटावमधील अवैध वाळूउपशाचा विधीमंडळ अधिवेशनातच पंचनामा
सातारा (प्रतिनिधी) – “”माण- खटाव मतदारसंघात महसूल विभागच वाळू तस्करीत सहभागी असल्याने काहीच कारवाई होत नाही. माझ्या या मतदारसंघात तर महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारीच वाळू धंद्यात सहभागी आहेत. तहसीलदारांची तर या धंद्यात पार्टनरशिपच आहे,” अशी माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिल्याने खळबळ उडाली आहे.
माण – खटाव मतदारसंघात राजरोसपणे अवैध वाळूउपसा सुरु आहे. परवाने नसताना दररोज हजारो ब्रास वाळूउपशाला महसूल विभाग कारणीभूत आहे, असे सांगत गोरे यांनी माण- खटावच्या बहुचर्चित अवैध वाळू उपशाचा थेट अधिवेशनातच पंचनामा केला. अधिवेशनात अनुदान मागणीवर चर्चा करताना आमदार जयकुमार गोरे यांनी अवैध वाळूउपसा आणि महसूल विभागाचे वाळू तस्करांशी असलेले साटेलोटे उघड केले. आ. गोरे म्हणाले, “”महसूल विभागाकडून वाळूउपशाबाबत धोरण ठरविण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात ते धोरण अंमलात येत नाही. सध्या वाळूउपशावर बंदी आहे. काही निर्देशानुसार लिलाव झालेल्या ठेक्यांवरील वाळू उपशाला नियमानुसार परवानगी दिली जाते. मात्र, माण- खटाव मतदारसंघात राजरोसपणे अवैध वाळूउपसा सुरु आहे. पाच- सहा पोकलेन आणि इतर मशिनरीच्या साह्याने दिवसाला शंभरपेक्षा अधिक गाड्या अवैध वाळू उपसा सुरु आहे.
मी याबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे तक्रारी केल्या. मात्र, महसूल विभागच वाळू तस्करीत सहभागी असल्याने काहीच कारवाई होत नाही. माझ्या मतदारसंघात तर महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारीच वाळू धंद्यात सहभागी आहेत. तहसीलदारांची तर या धंद्यात पार्टनरशिपच आहे. दर महिन्याला एका ट्रॅक्टरसाठी पन्नास हजार, डंपरसाठी एक लाख, जेसीबी दोन लाख तर पोकलेनसाठी तीन लाखांचा रेट फिक्स करण्यात आला आहे. हे पैसे गोळा करण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची साखळीच कार्यरत आहे.”
अवैधरित्या उपसा केलेल्या वाळूच्या एका गाडीची 35 ते 40 हजार रुपयांना विक्री केली जाते. सर्व अधिकाऱ्यांचे भागवून वाळू तस्करांना एका गाडीचे 15 हजार रुपये मिळतात. अशा प्रकारच्या मोठ्या कमाईतून वाळू तस्कर आणि महसूलचे अधिकारी गब्बर झाले आहेत. गोरगरीबांच्या घरकुलासाठी लागणाऱ्या वाळूला परवानगी मिळत नाही. मात्र, तहसील कार्यालयाबाहेर खासगी यंत्रणा उभारुन वाळू तस्कर राजरोसपणे हजारो ब्रास वाळूचा उपसा करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. खटाव आणि माण तालुक्यातील अवैध वाळू उपशाचा पंचनामा थेट अधिवेशनात केल्याने दोन्ही तालुक्यांत खळबळ उडाली आहे. वाळू तस्कर आणि महसूल विभागातील झारीतील शुक्राचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
अधिवेशनात दाखवले फोटो आणि क्लिपही…
आ. जयकुमार गोरे यांनी अधिवेशनात बोलतानाच माणमध्ये पोकलेन, जेसीबी मशिन्सच्या साह्याने सुरु असलेल्या वाळू उपशाचे फोटो आणि क्लिप दाखवली. गेल्या काही दिवसांपासून खटाव आणि माण तालुक्यातील अवैध वाळू उपसा चांगलाच चर्चेत आहे. वाळू तस्करांकडून तहसीलदारांच्या गाडीला धडक दिल्याच्या प्रकरणाचीही उलटसुलट चर्चा झाली होती. महसूल विभागातील मंथली गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तर अनेक किस्से वारंवार ऐकायला मिळत असतात. आता माण खटावचा अवैध वाळूउपसा थेट अधिवेशनातच पोहचला आहे.