पुणे – राज्यात साथ रोग कायदा लागू झाला आहे. नागरिकांनी त्याचे गांभीर्य समजून घ्यावे. या कायद्यानुसार कारवाई करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.
करोनासंदर्भात डॉ. म्हैसेकर म्हणाले, “शासनाच्या आदेशानुसार पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा-महाविद्यालये बंद ठेवली आहेत.’ दरम्यान, मॉल बंद ठेवण्यात यावेत, असे प्रशासनाने शनिवारी रात्रपर्यंत म्हटलेले नव्हते. पण मॉलमध्ये जर सिनेमागृह असेल किंवा तेथील हॉल असतील तर ते बंद करावेत असे आदेश होते. मात्र, शनिवारी रात्री आलेल्या आदेशांनुसार मॉलदेखील बंद करण्यात आले आहेत.
नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दुसऱ्या बाजूला “शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असली, तरी खासगी क्लासेस व स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुरू आहेत. अशा क्लास चालकांनाही सूचना दिल्या आहेत. त्यांनी आपले क्लासेस किंवा अभ्यासिका शक्यतो बंद ठेवाव्यात. विद्यार्थी आता गावी जात आहेत. त्यामुळे अभ्यासिका आता बंद राहतील,’ असे डॉ. म्हैसेकर म्हणाले.
जागरूकता वाढली
पुणे शहर परिसरात करोना रुग्ण आढळल्यानंतर आता जागरूकता निर्माण होत आहे. काही नागरिक जे परदेशातून आले आहेत, तेदेखील आम्हाला संपर्क साधून “आमची तपासणी करा’ असे म्हणत आहेत. त्यामुळे सध्या तपासणीसाठी गर्दी वाढत असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.