वॉशिंग्टन : करोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन करण्याचे बहूतेक सर्वांनीच सोडले आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील हीच पद्धत योग्य असल्याचे सांगत भारतीय परंपरेचे कौतूक केले आहे. अशा पद्धतीवरून करोना विषाणूचा प्रतिबंध करण्याबाबत भारत जगात इतर देशांपेक्षा पुढे असल्याचे त्यांनी अनौपचारिकपणे म्हटले.
आर्यलंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते मूळचे भारतीय वंशाचे आहेत. त्यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन न करता नमस्ते केले. यावरून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले, मी काही दिवसांपूर्वीच भारतातून परतलो. तिथे असताना मी कोणाशीच हस्तांदोलन केले नाही. कारण तिथे नमस्ते करण्याची पद्धत आहे आणि ती खूप सोपी आहे. आपले दोन्ही हात जोडून नमस्ते करीत त्यांनी ही माहिती दिली.
करोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगातील अनेक देशांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. भारताने 15 एप्रिलपर्यंत काही देशातील नागरिकांना व्हिसा देण्यावर तूर्त बंदी घातली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर करोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.