पुणे – ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्टिंग तयार करण्याचा प्रकल्प योग्य प्रकारे न चालवताच महापालिका प्रशासनाने “मे. इकोमॅन एन्व्हायरो सोल्युशन्स’ या ठेकेदारावर 10 कोटी रुपये खर्च केला आहे. पुणेकरांचा कररूपी पैसा कचऱ्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
2016 मध्ये 24 तासात कंपोस्टिंग करून ओला कचरा जिरवण्याचा प्रकल्प करण्याचा घाट घनकचरा विभागाने घातला. हा प्रकल्प यशस्वीपणे राबवून मग पुढे जाणे संयुक्तिक होते.
प्रकल्प मार्च 2017 ते जून 2018 हे पंधरा महिने रडतखडत चालले. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी महापालिकेने कंत्राटदाराला 9.38 कोटी रुपये दिले तसेच कचरा प्रोसेसिंग फी म्हणून 24 लाख रुपये दिले. तर, प्रकल्पाचे वीजबीलही महापालिकेने भरले आहे.