सर्वसामान्य गृहिणीने एखाद्या व्यवसायात उतरून यशस्वी होणे तसे सोपे नाही. घरसंसार सांभाळून चौकटीबाहेर कार्यरत राहत कुटुंबाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या फलटणच्या सौ. चांदणी अजय माळवे हे असेच प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व.
महिलांना कोणत्याही क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली की त्या मेहनत घेऊन यशाची शिखरे गाठू शकतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. गृहिणी ते व्यावसायिक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे…
फलटण येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेने चाकोरीबाहेरची कामगिरी करून आपले कर्तृत्त्व सिद्ध केले आहे. त्यामागे प्रचंड मेहनत आणि कष्ट कारणीभूत आहेत. सौ. चांदणी अजय माळवे यांनी सर्वसामान्य गृहिणी म्हणून काम करत असताना व्यवसाय करून कुटुंबाची उन्नती साधण्याचे ठरविले आणि त्यांनी त्यात यश मिळवून दाखवले. आज त्या शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्यांनी केलेली वाटचाल खडतर होती. अनेक प्रकारच्या अडचणींवर मात करीत त्यांनी निवडलेला मार्ग साध्य केला. संघर्षातून स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास साध्य करण्याची किमयाच त्यांनी करून दाखवली.
पती नगरसेवक, पत्रकार आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे. त्यामुळे घराची जबाबदारी प्रामुख्याने सौ. चांदणी यांच्याकडेच असायची. त्याशिवाय पतीच्या सामाजिक कार्यातही त्यांना सहकार्याची भूमिका घ्यावी लागत असे. त्यातूनही व्यवसाय करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. फलटण शहरातील तेली गल्लीत आपल्या घरी ब्युटीपार्लर सुरू करून त्यांनी आपल्या वेगळ्या कामगिरीला सुरवात केली. घरातील सर्व कामे सांभाळण्याची कसरत त्यांना करावी लागत होती. पार्लरचे काम व्यवस्थित सुरू झाले. त्यांच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण झाला. घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपण आणखी आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकतो, असा विचार त्यांच्या मनात आला. त्या जिद्दीने त्या कामाला लागल्या. ब्युटीपार्लरबरोबरच महिलांच्या कपड्यांची विक्री करण्याचे त्यांनी ठरविले.
महिलांच्या गरजा ओळखून त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे बाजारपेठेचा अभ्यास केला. या क्षेत्रांतील स्पर्धा लक्षात घेतली. आणि जमेल तेवढे कष्ट घ्यायचे, मेहनत करायची असे ठरवून त्यांनी व्यवसाय विस्तारासाठी पावले उचलली. सुरवातीला घरातूनच महिलांसाठी लागणारे कपडे, गाऊन्स विकण्यास सुरवात केली. या विक्रीला महिला वर्गाचा प्रतिसाद मिळू लागला. घरातील सारे सांभाळून हे काम करताना घरापेक्षाही स्वतंत्र जागेत व्यवसाय करण्याचे त्यांनी योजिले.
महिलांचा प्रतिसाद व मागणी पाहून त्यांनी फलटणमधील कदम कॉलनीत सिंगार लेडिज इनर वेअरफ ही महिलांसाठीची शॉपी सुरू करण्याचा निर्णय घेतला. फलटणसारख्या शहरात अशा प्रकारची शॉपी म्हणजे महिला व मुलींसाठी मोठी सुविधाच ठरली. या लेडिज शॉपीमध्ये सर्व नामांकित कंपन्यांनी उत्पादित केलेले असंख्य प्रकारचे महिलांसाठीचे कपडे उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर जीन्स, टॉप, लेगीज, ड्रेस, ओढणी, ड्रेस मटेरिअल, नाईटी, गाऊन्स, बेडरूम पिस, परिमाला सेट, स्लीप, स्लॅक्स, ब्लाउजपिस मॅचिंग सेंटर तसेच महिलांसाठी सौंदर्यवर्धक प्रसाधने अशी सर्व प्रकारची उत्पादने महिलांना सहज उपलब्ध होतील, अशी व्यवस्था त्यांनी केली.
या शॉपीमुळे सर्व स्तरातील महिलांना याठिकाणी सुविधा उपलब्ध झाली आहे. दर्जेदार कपडे पुरविण्याबरोबरच किफायतशीर दर आणि विनम्र सेवा देण्याला त्यांनी महत्त्व दिले. म्हणूनच फलटणमधील महिलांच्या मनात या शॉपीने वेगळे स्थान मिळविले आहे. एक गृहिणी आपल्या नियोजनपूर्वक कष्टमय प्रयत्नाने आपले स्वप्न साकारू शकते. एवढेच नव्हे तर आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी हातभार लावू शकते, हेच सौ. चांदणी यांनी मेहनतीने सिद्ध केले आहे.