पुणे – “वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परतावा धोरण अधिकाधिक सहज व सोपे करण्याच्या हेतूने “नवीन जीएसटी रिटर्न’ धोरण तयार करण्यात आले आहे. येत्या 1 एप्रिलपासून ही नवी व्यवस्था लागू करण्यात येणार आहे.
तिमाही जीएसटी भरण्याच्या सुविधेसह प्रणालीतील सुसूत्रता यामुळे करदात्यांना दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मुख्य कर आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी केले. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग व दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे विभागतर्फे आयोजित “जीएसटी न्यू रिटर्न्स’ या विषयावरील कार्यशाळेत मिश्रा बोलत होत्या. यावेळी वस्तू आणि सेवा कर पुणे विभागाचे आयुक्त अतुल कुमार गुप्ता, राजीव कपूर, आकाश चौगुले, रोहित निगवेकर, अधीक्षक अतुल कुमार श्रीवास्तव, “आयसीएआय’ पुणेचे अध्यक्ष अभिषेक धामणे, उपाध्यक्ष समीर लढ्ढा उपस्थित होते.
मिश्रा म्हणाल्या, येत्या काळात लागू करण्यात येणारी नवीन जीएसटी रिटर्न व्यवस्था अधिक सोपी असेल आणि छोट्या व्यवसायांना कर परतावा करणे सुलभ जाईल. नवीन जीएसटी रिटर्नमध्ये जीएसटी मासिक, तसेच त्रैमासिक दाखल करता येईल. छोट्या व्यवसायांसाठी हे उपयुक्त ठरणार असून, यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल.