पुणे – शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक अर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आणखी 81 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आणखी एका संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. फसवणुकीचा आकडा वाढून तो 153 कोटी 50 लाख रुपयांपर्यंत गेला आहे, अशी माहिती आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
आमदार अनिल भोसले, सूर्याजी जाधव, तानाजी पडवळ आणि शैलेश भोसले यांची यापूर्वीच पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर 16 जणांविरोधात यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आमदार भोसले हे बॅंकेचे अध्यक्ष, संचालक असताना जाधव हे संचालक होते. तसेच पडवळ हे बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शैलेश भोसले हे बॅंकेचे मुख्य हिशेब तपासणीस होते. बॅंकेत ठेवींचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने लेखारीक्षक असलेल्या फिर्यादी यांच्या कंपनीला बॅंकेच्या रोख शिल्लक रक्कम पडताळणी करण्यासाठी सांगितले होते.
यावेळी बॅंकेकडे 71 कोटी 78 लाख 87 हजार रुपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखवून फसवणूक करण्यात आली होती. अर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात कर्जप्रकरणात 80 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यासह बॅंकेतील ठेवी, कर्ज प्रकरणांच्या ऑडिटसाठी यापूर्वीच्या ऑडिटर कंपनीचीही चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.
निर्बंधानंतरही दीड कोटी काढले
बॅंकेत रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने भोसले सहकारी बॅंकेच्या अर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले होते. एकावेळी एका ग्राहकास केवळ 1 हजार रूपये काढण्याचा अधिकार देण्यात आला होता. मात्र, यानंतरही दीड कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचे समोर आले आहे.