पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सर्वाधिक अपघात घडणाऱ्या भागातील अपघातग्रस्तांची वैद्यकीय उपचारांसाठी परवड होत आहे. बोरघाट ते खालापूर या रस्त्यावर अधिक अपघात होत असून, येथे ट्रामा केअर सेंटरची सुविधा नसल्याने अपघातातील जखमींना उपचारांसाठी पनवेल येथे जावे लागत आहे.
द्रुतगती महामार्गावर 2019 मध्ये 73 अपघातांत 97 जणांचा मृत्यू झाला. 2018 मध्ये 96 अपघातांत 110 जणांना प्राण गमवावा लागला होता. गेल्या वर्षात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, घटत्या अपघातांबरोबरच आणखी एक चिंतेची बाब समोर आली असून, गोल्डन अवर्समध्ये उपचार मिळवण्यासाठी अपघातग्रस्तांची परवड होत आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास द्रुतगती महामार्गाची विभागणी घाट क्षेत्र, घाटाखालील भाग (मुंबईकडील) आणि घाटावरील भाग (पुण्याकडील) अशी तीन भागात होते. यामध्ये सर्वाधिक अपघात हे घाट क्षेत्रात आणि घाटाखालील भागात झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
मागील वर्षभराची तुलना करता सर्वाधिक अपघात हे रायगड, नवी मुंबईत झाले आहेत. यावरून घाटाखालील भागात जास्त अपघात होत असल्याचे स्पष्ट होत आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी पनवेलला हलवावे लागत असल्याने वेळ वाया जात आहे. द्रुतगती महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. उभारणीनंतर जवळपास तीन ते चार वर्षांनी ते कार्यान्वित झाले. मात्र, आता घाट क्षेत्र आणि मुंबईकडील भागात अधिक अपघात होत असल्याने तेथेही खालापूरजवळ ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होत आहे.