पुणे – एकीकडे तापमाना आणि शहराच्या हवेतील प्रदूषणकारी घटकांमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत हवेमधील हानीकारक घटकांनी शंभरी पार केली आहे.
यंदा लांबलेल्या पावसामुळे शहराची हवा स्वच्छ होती. तसेच, देशातील चार प्रमुख महानगरांच्या तुलनेत पुण्याची हवा “स्वच्छ’ असल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत शहराच्या हवेतील प्रदूषके वाढली असल्याची नोंद “सफर’ या हवा प्रदूषणविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेकडून नोंदविण्यात आली. संस्थेच्या मते गेल्या दोन दिवसांतील “पीएम10′ या घटकांचे प्रमाण शंभर क्युबिक मीटर या प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त म्हणजे 118 ते 189 क्युबिक घनमीटर यादरम्यान होते. तर पुढील दोन दिवसांत हे प्रमाण 100 क्युबिक घनमीटरपेक्षा जास्तच राहणार असल्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेच्या गुणवत्तेसंदर्भात घेतलेल्या नोंदीनुसार जानेवारीत हवेतील “पीएम 10′ या हानीकारक घटकात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. या नोंदीनुसार, जानेवारीत या घटकाची पातळी 165 क्युबिक घनमीटर इतकी होती.