“अँटी करप्शन’ची फलटण येथे कारवाई; जिल्हा पोलीस दलात खळबळ
सातारा – फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री फलटण येथे करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, ज्ञानेश्वर अशोक दळवी (वय 33, रा. फ्लॅट नं. 6, व्यंकटेश प्राईड, भडकमकरनगर, फलटण, मूळ रा. मलटण, ता. दौंड, जि. पुणे) हा फलटण शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने तक्रारदाराच्या मामाच्या मुलास फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल (दि. 17) मध्यरात्री फलटण येथे सापळा लावला. त्यावेळी तक्रारदाराकडून 20 लाख रुपयांच्या लाचेपैकी पहिला हप्ता म्हणून चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना ज्ञानेश्वर दळवी याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अशोक शिर्के, संजय साळुंखे, विनोद राजे, विशाल खरात, तुषार भोसले यांनी ही कारवाई केली.
दळवी याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, गेल्याच आठवड्यात रहिमतपूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जगदीश कणसे यास 12 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. एका आठवडाभरात पोलीस दलातील दोघांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.