रामलीला मैदानावर उद्या सकाळी होणार शपथविधी सोहळा
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी हॅट्रटीक करत पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनले आहेत. दरम्यान, उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सहा मंत्रीदेखील शपथ घेणार आहेत. या सहा मंत्र्यांमध्ये मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे. 16 फेब्रुवारी म्हणजे उद्या रामलीला मैदानात सकाळी 10 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम आदमी पक्षाच्या वतीने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रणाचे पत्र पाठवले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वाराणसी येथे असणार आहेत. ‘आप’च्या गोपाल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सर्व सात खासदारांना आणि भाजपच्या आठ नवनिर्वाचित आमदारांना या शपथविधी सोहळ्या आमंत्रण देण्यात आले आहे.
इतर कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री किंवा नेत्यांना या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले नाही, कारण हा सोहळा दिल्लीसाठी असणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींद्वारे दिल्लीकरांना शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामलीला मैदानात जोरदार तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाला पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाला तीन हजार पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. दिल्ली सरकार, दिल्ली महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग मिळून या सोहळ्याची तयारी करत आहेत.