ट्रम्प यांनी भारत देशालाच गरीबीत काढले; विकसनशील देशांच्या यादीतून भारत बाहेर
मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते अहमदाबादलाही भेट देणार असल्याने तिथल्या झोपड्या लपवण्यासाठी एक ६०० मीटरची भिंत बांधण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारला फटकारले आहे.
फाटक्या झोळीला ठिगळे लावण्यापेक्षा मोदीजी जरा इकडे बघा…गरिबी झाकण्याची आता गरज नाही, कारण, ट्रम्प यांनी भारताला विकसनशील देशांच्या यादीतून वगळले असून अक्षरशः गरिबीत काढले आहे. त्यामुळे आता भारताला अमेरिकन करांतून निर्यातीत सूट मिळणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
भारत, चीन आणि दक्षिण कोरिया जागतिक व्यापार संघटनेच्या सवलतींचा गैरफायदा घेत असून त्याचा फटका अमेरिकेला बसत असल्याचा बहाणा अमेरिकेच्या प्रशासनाने केला आहे. विकासदर आधीच खालावलेला असताना, ५ ट्रिलीयन डॉलरच्या स्वप्नांना सुरूंग लागलेला असताना, आता भारतासाठी हा अमेरिकेचा मजबूत झटका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर म्हटले आहे.