कॅन्टोंन्मेंट विधानसभेसाठी आमदार आपल्या दारी उपक्रम
पुणे : विधानसभा निवडणूकीत दिलेली आश्वासने तसेच मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात आमदार सुनील कांबळे यांच्यावतीने आमदार आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत राजेवाडी ,यंग भोर्डे आळी, नरपतागिरी चौक ,मंगळावर पेठ भागात नुकताच हा उपक्रम पार पडला. त्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीनं उपाय योजना करण्यात येत असल्याने मतदारांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात असल्याचे आमदार कांबळे यांनी सांगितले.
आमदार कांबळे यांच्या वतीने मागील महिन्याभरापासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांच्या समस्या जाणून घेत तसेच त्यांना या समस्या सोडविण्यासाठी काय हवे आहे याची माहीती घेतली जाते, यावेळी महापालिकेचे स्थानिक अधिकारीही उपस्थित असतात, त्यांच्या उपस्थितीतच या समस्यांची नोंद करून घेत त्या सोडविण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेतले जात आहेत. त्यात, नागरिकांकडून पाणी, कचरा, वाहतूक कोंडी तसेच आरोग्य विषयक समस्या मोठया प्रमाणात मांडण्यात येत असून त्या सोडविण्यासाठी अल्पकालीन उपाय योजनांसह, त्या कायमच्या सोडविण्यासाठी दिर्घकालीन कृती आरखडाही करण्यात येत आहे. त्यानुसार, राज्यशासन तसेच महापालिकेच्या माध्यमातून या समस्यावर तोडगा काढून मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आमदार कांबळे यांनी स्पष्ट केले.