नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना दुय्यम खाते
मुंबई : माजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले तसेच गेली अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून त्यांना दुय्यम दर्जाची खाती देण्याचा सपाटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केला आहे.
फडणवीस यांच्या मर्जीतल्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची रवानगी आता प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या पदावर केली आहे. विशेष म्हणजे मनिषा म्हैसकर यांचे पती मिलिंद म्हैसकर हे फडणवीस यांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते.
सामान्य प्रशासनाने बुधवारी 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर गुरुवारी आणखी 9 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांना मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव एम. डी. पाठक यांची नियुक्ती प्रधान सचिव नगर विकास-2 या पदावर केली असून शिर्डी येथील साईबाबा विश्वस्त संस्थेतील मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. मुगळीकर यांना परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदावर पाठविण्यात आले आहे.
व्ही.एन. सूर्यवंशी यांची बदली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. पुणे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली पुणे येथील पशु संवर्धन विभागाच्या आयुक्तपदी केली असून मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातील सहसचिव सी.के. डांगे यांना मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त एम. देवेन्द्र सिंह यांची बदली यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदावर करण्यात आली आहे. तर परभणीचे जिल्हाधिकारी सिवा शंकर यांना नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे.