रायपुर: छत्तीसगड राज्यातील बिजापुर जिल्ह्यात सोमवारी सकाळी सीआरपीएफचे कमांडो आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन कमांडो शहीद झाले तर एक नक्षलवादीही मारला गेला आहे. त्या जिल्ह्यातील इरापल्ली गावातील जंगलात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमाराला ही चकमक झाली. या जंगलात सीआरपीएफचे कमांडो तपासणीसाठी गेले असताना त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी ही चकमक झाली. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अन्य दोन कमांडो जखमी झाले आहेत. शहीद झालेल्या दोन कमांडोंमध्ये सीआरपीएफच्या डेप्युटी कमांडंटचा समावेश आहे. या चकमकीच्या वृत्तानंतर तेथे जादा फौज फाटा पाठवण्यात आला असून त्या परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही.