पुणे : स्वत:च्या फायद्याकरिता ज्यादा औषधे मागवून शासकीय औषधांची अफरातफर केल्याच्या प्रकरणातून सेंट्रल गर्व्हरमेंट हेल्थ स्किम (सीजीएचएस) च्या दवाखान्यातील सिनिअर फार्मासिस्ट स्टोअर किपरची सीबीआय विशेष न्यायाधीश न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी निर्दोष मुक्तता केली.
अधिक औषधे मागविण्यास तो एकटा जबाबदार नाही. वरिष्ठ वैदयकीय अधिकारी अथवा अतिरिक्त संचालक हे देखील त्यास जबाबदार असून, आरोपीने शासकीय अफरातफर केल्याचे आणि स्वत:च्या फायद्याकरिता वापरल्याचे सिध्द न झाल्याने हा आदेश देण्यात आला.
किशोर बाबुराव देसाई असे त्यांचे नाव आहे. त्याच्या वतीने ऍड. आयुब पठाण यांनी न्यायालयात बाजू मांडली. 14 आणि 15 मे 2012 रोजी सीबीआयने मुंकुंदनगर येथे छापा टाकला होता. त्यावेळी औषधांच्या साठ्यात अफरातफर झाल्याचे आढळून आले होते.
सीबीआयने या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13 (1) (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सरकारी पक्षाने 35 साक्षीदार तपासले. शासकीय औषधांची अफरातफर झाल्याचा आरोप सीबीआय सिद्ध करू शकले नाही.