पालिकेतील विरोधकांच्या प्रभागांना दिला होता कमी निधी
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचे अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात आहे. या अंदाजपत्रकामध्ये पालिकेतील विरोधी पक्षांचे सदस्य कार्यरत असलेल्या प्रभागांना कमी निधी देण्यात आला होता. याबाबत दैनिक प्रभातमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच “फ’ प्रभागातील कामांसाठी तब्बल 44 कोटींनी निधी वाढविण्यात आला आहे. याच प्रभागाला सर्वांत कमी निधी देण्यात आला होता.
पिंपरी चिंचवड महापलिकेचे अंदाजपत्रक फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीसमोर सादर केले जाणार आहे. आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांचाच या अंदाजपत्रकामध्ये वरचष्मा आहे. महापालिकेमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक “फ’ प्रभागातील निधी वाढविला तयार करण्याचे काम सुरू आहे. अंदाजपत्रकामध्ये सर्वात कमी निधी हा “फ’ प्रभागाला देण्यात आला होता. तर सर्वाधिक 256 कोटींचा निधी हा “क’ मुख्यालयाला देण्यात आला होता. “फ’ प्रभागामध्ये विरोधी पक्षाचे अधिक नगरसेवक कार्यरत आहेत.
राज्यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसचे सरकार असतानाही स्थानिक पातळीवर मात्र या पक्षांच्या नगरसेवकांना डावलण्यात आल्याचे अंदाजपत्रकातून समोर आले होते. याबाबत दैनिक प्रभातने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची महापालिका प्रशासनाने दखल घेत निधी वाटपामध्ये बदल केले आहेत. सर्वात कमी म्हणजेच 76 कोटी निधी दिलेल्या “फ’ प्रभागासाठी 44 कोटींची वाढ करत 120 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
“फ’ प्रभागाचा निधी वाढविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत होतो. दैनिक प्रभातमध्ये बातमी आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. 76 कोटींवरून हा निधी 120 कोटी केला आहे. 76 कोटींमध्ये त्या प्रभागामध्ये विकासकामे करणे शक्य नव्हते. मात्र, 120 कोटींची तरतूद करण्यात आल्याने प्रभागातील महत्त्वाची कामे करता येणार आहेत.
– दत्ता साने, माजी विरोधी पक्षनेते