लोणंद – लोणंद- खंडाळा रस्ता लवकरच दुरूस्त होऊन रस्ताची अवस्था चांगली होईल,ही आस लावून बसलेल्या जनतेच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे.
खंडाळा ते लोणंद या आधीच डबघाईला आलेल्या रस्त्याची यावर्षी झालेल्या पावसात अक्षरशः धुळधाण ऊडून चाळण झाली होती.
वाहनचालकांना खड्डे चुकवता चुकवता नाकी नऊ येत आहे. खंडाळा ते लोणंद या जेमतेम वीस- एकवीस किलोमीटर अंतरासाठी तासभर प्रवास करावा लागत होता. अशातच निवडणूक काळात पाच कोटींचा निधी या रस्त्यासाठी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले जात असल्याने जनतेचा रोष तात्पुरता थोपवण्यात आला होता. लोणंद- खंडाळा रस्ता लवकरच दुरूस्त होणार, त्यासाठी आमदारांनी भरीव तरतूद केली आहे, अशा अर्थाचे मेसेज विधानसभा निवडणुकीपूर्वी खंडाळा तालुक्यातील विविध ग्रूपवर फिरत होते.
प्रत्यक्षात काही ठिकाणी रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले. मात्र, ही सगळी तात्पुरती मलमपट्टीच आहे की काय अशी शंका आता खंडाळा- लोणंद प्रवास करणाऱ्या अनेकांच्या मनात आहे. अजूनही या रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पाहयला मिळत आहे. तसेच अनेकदा अपघात होऊन कित्येक जखमी झाले आहेत तर मागच्याच आठवड्यात खड्डे चुकवताना झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
सध्या अर्धवट स्वरूपातील हा रस्ता काही ठिकाणी पुन्हा उखडायला लागल्याने वाहनचालकांत संतापाचे वातावरण आहे. हा रस्ता दुरूस्त करताना कामाच्या गुणवत्तेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता केला जात असल्याने अवघ्या काही दिवसांतच जागोजागी ठिगळे लावलेला रस्ता पुन्हा खड्ड्यात जाणार आहे, याबाबत लोकांच्या मनात कुठलाही संभ्रम नाही. लोणंद- खंडाळा नियमित प्रवास करणारांसाठी हा प्रवास म्हणजे डोकेदुखीच ठरत आहे.
नाममात्र डांबराचा शिडकावा
लोणंद- खंडाळा रस्ता दुरूस्त करत असताना जागोजागी मूळ रस्त्यावर खडी टाकून त्यावर नाममात्र डांबराचा शिडकावा दिला आहे. वर बारीक कच टाकून त्यावर रोलर फिरवला जात आहे. मात्र, डांबर कमी प्रमाणात वापरले असल्याने त्यावरून वाहने गेली की, पुन्हा रस्ता उखडला जात आहे.