कार्ला पर्यटनस्थळी पर्यटकांचे जुन्या खेळांना व कृषीभेटीला महत्त्व
पर्यटकांच्या शेतभेटीमुळे शेतकऱ्यांना फायदा; व्यवस्थापनाला चालना
कार्ला – महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या कार्ला निवास केंद्रांत पर्यटकांना आपली महाराष्ट्रीय संस्कृती, खेळ, मनोरंजनासाठी विविध सोयीसुविधा देण्यात येत आहेत. पर्यटकांना शेतीचा अनुभव घेता येत असल्याने पर्यटन केंद्रात आलेल्या पर्यटकांना आनंद मिळत आहे.
पर्यटन विकास महामंडळ कार्ला निवास केंद्रात मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांतील तसेच देशातील व परदेशातील पर्यटक भेट देत आहेत.पर्यटकांना आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीची ओळख व्हावी, आपल्या जुन्या खेळांची मजा अनुभवण्यासाठी व शेतीपूरक गोष्टींची माहिती व्हावी तसेच याद्वारे आपल्या परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांना थोडा मोबदला मिळेल व युवकांना रोजगार निर्माण होईल, या हेतूने अनेक उपक्रम या केंद्रात राबविले जातात असे व्यवस्थापक महादेव हिरवे यांनी सांगितले.
पर्यटकांना परिसरातील घेतल्या जाणाऱ्या पिकांची माहिती दिली जाते. तसेच निवासी पर्यटकांसाठी विविध स्पर्धा, शारीरिक खेळ, बौद्धिक खेळ, आपले महाराष्ट्रीयन जुणे खेळ विटीदांडू, अट्यापट्या, कबड्डी, गोट्या, निंगोरच्या, भोवरा अशाप्रकारच्या खेळांचा आनंद घेता येत असल्याने पर्यटक आनंदीत होत आहेत.