पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण केलेल्या टपऱ्या, हातगाड्या व विक्रेत्यांवर अतिक्रमण विरोधी विभागाच्या वतीने कारवाई सुरू आहे. जप्त केलेले साहित्य नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमयच्या गोदामात जमा केले जाते. मात्र येथील गोदामाची जागा अपुरी पडत असल्याने या विभागापुढील अडचणी वाढल्या आहेत.
महापालिकेच्या मध्यवर्ती अतिक्रमण विरोधी विभागामार्फत शहरातील वेगवेगळ्या भागांत दररोज कारवाई केली जात आहे. जप्त केलेल्या टपऱ्या, हातगाड्या, तीन व चारचाकी टेम्पो, जाहिरात फलक, बोर्ड, टेबल व खुर्च्या आणि इतर साहित्य नेहरूनगरच्या गोदामात जमा केले जात आहे. हे सर्व साहित्य गोदामात पडून आहे. दंड जास्त असल्याने विक्रेते व व्यावसायिक ते साहित्य सोडवून घेण्यासाठी येत नाहीत. परिणामी, गोदाम फुल्ल झाले आहे.
या भंगार साहित्याचा लिलाव केल्यास महापालिकेस मोठे आर्थिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या भंगार साहित्याचा लवकरात लवकर लिलाव करून जागा मोकळी करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले की, नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील गोदामात जप्त केलेले साहित्य मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. त्या भंगार साहित्याचा लिलाव करण्याबाबत विचार सुरू आहे.
हातगाड्या व टपऱ्या जप्त केल्यानंतर काही दिवसात पुन्हा नव्याने रस्त्यावर अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे सातत्याने कारवाई करण्यावर भर देण्यात येत आहे. जून 2018 पासून सुरू केलेल्या कारवाईत तब्बल 2 हजार 810 हातगाड्या, 1 हजार 220 टपऱ्या, तीन व चारचाकी 186 टेम्पो, 17 हजार 400 इतर साहित्य आणि 12 हजार 500 फ्लेक्स व बॅनर जप्त करण्यात आले आहेत.