नवी दिल्ली : देशभर खळबळ उडवणाऱ्या निर्भया प्रकरणात फाशीचे डेथ वॉरंट उद्या म्हणजे एक फेब्रुवारीला निश्चित असताना दिल्ली न्यायालयात फाशीला स्थगिती देणची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. तिहार कारागृहाने केवळ एका आरोपीच्या दयेच्या अर्जावर निकाल बाकी आहे. त्यामुळे अन्य आरोपींना फाशी देता येईल अशी भूमिका घेतली. त्याला आरोपींच्या वकीलांनी आक्षेप घेतला. एका आरोपीची याचिका प्रलंबित असेल तर अन्य आरोपींना फासावर लटकवता येत नाही, असे कायदा सांगतो, असे आरोपींच्या वकीलांनी स्पष्ट केले त्यामुळे निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान या आरोपींना फाशीच्या तारखेबाबत अनिश्चितता कायम असताना मिरत कारागृहातील तिसऱ्या पिढीतील जल्लाद पवन तिहात कारागृहात गुरूवारी आला. फाशी देण्याच्या आधी दोन दिवस तो नियमा प्रमाणे येथे आला. त्याने फासाचा भक्कमपणा आणि अन्य तयारीची तपासणी केली. विनय या एका आरोपीने बुधावरी दयेचा अर्ज बुधवारी राष्ट्रपतींकडे दाखल केला.
या आरोपींना 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. त्याचे डेथ वॉरंटही काढण्यात आले होते. मात्र अन्य एका आरोपीचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे प्रलंबित असल्याने त्यावेळी फाशीची शिक्षा प्रलंबित ठेवण्यात आली होती. कारागृहाच्या नियमानुसार दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर 14 दिवसांनी फाशी देता येते. आरोपी अक्षय कुमार सिंग याची दुरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायलयाने गुरूवारी फेटाळली होती.