नगर – जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी योजनानिहाय प्राप्त झालेली देयके वेळेत अर्थ विभागास सादर करण्यास विलंब केल्यास संबंधीतांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिला.
आज दि.30 दुपारी गडाख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा झाली. गडाख सभापती झाल्यानंतर ही पहिलीच सभा होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच जिल्हा परिषद सदस्यांचे प्रवासभत्ते तीन महिन्याच्या आत तयार करून अदा करावेत अन्यथा संबंधीतास जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही या सभेत देण्यात येईल.
जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत विभागांना योजनानिहाय दिलेल्या तरतुदी व खर्चाचा आढावा घेण्यात आला. तसेच सर्व विभागांनी त्यांना दिलेल्या तरतुदीनुसार विहीत वेळेत खर्च करण्याबाबत सुचना करण्यात आल्या. ज्या विभागाकडून योजनानिहाय दिलेल्या तरतूदी खर्च होणार नाही त्यांनी तात्काळ सदर योजनेवरील तरतूद समाययोजन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच जिल्हा परिषद सेस अंतर्गत 100 टक्के निधी खर्च करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.