जेजुरी -जेजुरी पोलिसांनी गुरुवारी (दि 30) जेजुरी-नीरा रस्त्यावर भोरवाडी फाटा येथे एका कार मधील तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असणारा गावठी कट्टा, गांजा जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राहुल अण्णा रोहिले (वय 26, रा. इंदिरा नगर झोपडपट्टी डोंबवली इस्ट,) सुमेद रवींद्र कसबे (वय 25, रा. आझादी गाव डोंबवळी) राहुल राजेंद्र गावडे (वय 22, रा. ममदापूर ता. राहता जिल्हा अहमदनगर) यांना जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे.
या बाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि गुरुवार दि 30 रोजी नीरेकडून जेजुरीकडे एमएच 14 डीक्यू 5858 ही कार जात असून या गाडीत तीन जन संशयित इसम असल्याची खबर जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना मिळाली.
भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, नंदकुमार सोनवलकर, सहाय्यक फौजदार शिवा खोकले, पोलीस हवालदार गणेश दाभाडे, आप्पा पड्याळ, देवेंद्र खडे, सचिन किवळे, अक्षय यादव, गणेश कुतवळ, संदीप कारंडे, महेश उगले, धर्मवीर खांडे, अतुल मोटे, गजेंद्र बीरलिंगे, प्रल्हाद आव्हाड यांनी जेजुरी – नीरा रस्त्यावर भोरवाडी फाटा येथे सापळा लावला.
सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान भोरवाडी फाट्याजवळ गाडी येताच पोलिसांनी गाडी अडवली. त्या गाडीतील तिघा संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी कट्टा तसेच 179 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गावठी कट्टा, गांजा व त्यांची कार जप्त केली असून आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे करीत आहेत.