पुणे – पानिपत हा विषय वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज असून तो पराभवाचा नव्हे तर आपल्या शौर्याचा विषय आहे, असे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी केले.
ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आशुतोष गोवारीकर यांचा पानिपत चित्रपटाच्या माध्यमातून मराठ्यांचा पराक्रमाचा इतिहास मांडल्याबद्दल राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, सभागृह नेते धीरज घाटे आणि संस्थेचे अध्यक्ष अंकित काणे उपस्थित होते.
पानिपत हा विषय चेष्टेचा नसून ती मराठ्यांची शौर्यगाथा आहे. त्यामुळे या शौर्यगाथेचा शालेय अभ्यासक्रमात देखील सहभाग होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा यावेळी गोवारीकर यांनी व्यक्त केली. हरियाणा, राजस्थानमध्ये या चित्रपटावर घातल्या गेलेल्या बंदीवर गोवारीकर यांनी नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते चारुदत्त आफळे यांचे पानिपत या विषयावर व्याख्यान झाले.