पोलीस काका पथक पुन्हा कार्यान्वित

पोलीस आयुक्‍तांनी दिले आदेश : छेडछाड विरोधी पथकाच्या कामगिरीवर आयुक्‍तांचे थेट लक्ष

पिंपरी -“शहरात रोडरोमिओंचा सुळसुळाट’ या शीर्षकाखाली शनिवारी (दि. 25) दै. “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तात शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेली पोलीस काका ही योजना बंद झाल्याचे म्हटले होते. पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी या वृत्ताची दखल घेत शहरात पुन्हा “पोलीस काका’ पथक पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.

फेब्रुवारी महिना जवळ आला की महाविद्यालयात विविध डे साजरे होतात. त्यातच गेल्या काही वर्षांपासून “व्हॅलेंटाईन डे’चे फॅड सुरू झाल्याने विद्यार्थिंनींच्या त्रासात गेल्या काही वर्षांपासून वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलीस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी “पोलीस काका’ ही संकल्पना राबविण्यास सुरवात केली. ज्या पोलीसाची काका म्हणून नियुक्‍ती केली आहे, ते कर्मचारी शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. तसेच शाळेत सर्वांना एकत्र बोलावून त्यांना मार्गदर्शन करीत होते. तसेच पोलीस काकाचा फोटो आणि मोबाईल क्रमांकही शाळेत दर्शनी भागात लावण्यात आला होता. पोलिसांना पाहून रोडरोमिओ शाळा-महाविद्यालयाबाहेरून पळ काढत होते. यामुळे अनेक मुलींची रोडरोमिओंच्या ताब्यातून सुटका झाली होती. मात्र पोलीस आयुक्‍त शुक्‍ला यांची बदली झाल्यानंतर हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला.

पिंपरी चिंचवडचे विद्यमान पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी महिलांचे विनयभंग रोखण्यासाठी छेडछाड विरोधी पथक स्थापन केले. मात्र या पथकाला अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे शाळा महाविद्यालयात पुन्हा छेडछाड विरोधी पथक स्थापन करण्याचा निर्णय आयुक्‍तांनी घेतला. सध्या या पथकाची जबाबदारी वाहतूक विभागाच्या सहाय्यक आयुक्‍त निलीमा जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी नुकतीच कामाला सुरवात केली असून पोलीस काकांची बैठक घेतली. तसेच त्यांच्या कामाचे स्वरूप समजावून सांगितले. पोलीस आयुक्‍त स्वतः या पथकाच्या कामगिरीवर लक्ष ठेऊन असणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.