पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिंनीसाठी नवीन वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पाच मजली इमारती असलेल्या या वसतिगृहातील आतील काम पूर्ण होण्यास आणखी तीन-चार महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात मुलींसाठी नवीन वसतिगृह उपलब्ध होणार आहे.
सध्याच्या मुलींच्या वसतिगृहामागे नवे वसतिगृह उभारण्यात येत आहे. मात्र, तेथील राडारोडा न काढल्याने काम ठप्प होते. दरम्यान, पुणे विद्यापीठाचे मुलींच्या नवीन वसतिगृह बांधकाम करण्याविषयी दुर्लक्ष होत असल्याचे टीका होत होती. यावर अधिसभेतही जोरदार चर्चा झाली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून तातडीने आढावा घेत वसतिगृहाच्या कामास सुरुवात करण्यात आली.
तत्कालीन कुलगुरूंनी 13 फेब्रुवारी 2017 रोजी मुलींच्या नवे वसतिगृहाचे भूमिपूजन केले. त्यानंतर त्या जागेवरील असलेले सेवक वसाहतमधील लोकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले. मात्र, त्यापुढे काहीच कार्यवाही होत नव्हती. यामुळे विद्यापीठाकडून मुलींच्या वसतिगृह बांधण्याची मानसिकता नाही, असे सूर उमटत होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने मुलींच्या नव्या वसतिगृहाच्या कामात लक्ष घालत बांधकामास सुरुवात केली.
दरम्यान, नवीन मुलींचे वसतिगृह पाच मजली आहे. त्यात 200 मुलींना राहण्याची सोय आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून या वसतिगृहासाठी 5 कोटींची निधी मंजूर झाला आहे.
मुलींच्या नवीन वसतिगृहाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. येत्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण झाल्याचे दिसेल. जून-जुलैमध्ये प्रवेशित विद्यार्थिनींना हे नवीन वसतिगृह खुले होईल.
– आर. व्ही. पाटील, कार्यकारी अभियंता, पुणे विद्यापीठ