भवानीनगर – कण्हेरी (ता. बारामती) येथे सकाळी साडेसातच्यादरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये एक बोकड जागीच ठार झाला तर शेळी गंभीर जखमी झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे कन्हेरी- काटेवाडी परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. बारामती वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दोन्ही गावांतील नागरिकांनी केली आहे.
कन्हेरी येथील सतीश दिलीप काळे यांच्या शेतातील वस्तीवर गुरुवारी (दि.23) सकाळी साडेसातच्या सुमारास गोठ्यामध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या. त्या छपरामध्ये पाठीमागून येऊन बिबट्याने हल्ला केला. यामध्ये एका बोकडाचा गळ्याचा चावा घेतल्याने बोकड जागीच ठार झाले. तर शेळीवर हल्ला केल्याने गंभीर जखमी झाली आहे. याचदरम्यान शेळी जोरात ओरडल्याने नानासाहेब विठ्ठल काळे यांनी गोठ्याजवळ आले.
त्यावेळी बिबट्याने धूम ठोकली. बारामती वन विभागाचे वनपरिक्षेत्र मंडळ अधिकारी त्रिंबक जराड, वनरक्षक मीनाक्षी गुरव, वनरक्षक संध्या कांबळे यांनी पंचनामा करून परिसराची पाहणी केली. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. गौतम माने यांनी जखमी शेळीवर उपचार केले. वनविभागाने काळे कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. काटेवाडी परिसरात बिबट्याचा तिसरा हल्ला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक तातडीने बारामतीमध्ये दाखल झाले आहे.