वडगावशेरी (प्रतिनिधी) – साहेब आमच्या भागाचे पाणीप्रश्न सोडवणार नसेल तर मी आपल्यासमोर ठाण मांडून इथेच बसतो, किमान त्यामुळे आपल्यामधील आलेली निष्क्रियता तरी निघून जाईल आणि आमच्या भागातील पाणी प्रश्नांवर आपण लक्ष द्याल, असे खडेबोल नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना सुनावले. पाणी प्रश्नी अधिकाऱ्यांसमोर पाढा वाचत जमिनीवर त्यांनी बसकन मारली. नगरसेवकाच्या अशा भूमिकेमुळे अधिकारी चक्रावले, काय करावे, काय नाही.., असा पेच अधिकाऱ्यांना पडला.
खराडी येथील श्रीपार्क सोसायटी, गणेशनगर, आपले घर, तुळजा भवानीनगरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून पिण्याचा पाण्याचा मुख्य प्रश्न प्रलंबीत आहे, त्यामुळे प्रभाग 4 मधील नगरसेवकांकडून टॅंकरने पाठपुरवठा केला जात होता. अधिकाऱ्यांकडून मात्र, पाणी योजनेबाबत चालढकल सुरू होती.
काही भाग चढावर असल्यामुळे त्या ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही त्यासाठी अधिकाऱ्यांनी काहीतरी उपाययोजना करावी, कारण खराडी हा उच्चभ्रू नागरिकांचा भाग असून देखील काही ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यावर उपाययोजना करण्यात यावी, याकरीता नगरसेवकांकडे नागरिक सातत्याने चकरा मारीत आहेत. याच कारणातून नगरसेवकाने आज थेट पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय गाठून अधिकाऱ्यांसमोर बसकन मारली. नगरसेवक अचानकपणे अशाप्रकारे जमिनीवर बसल्याने पाणी पुरवठा विभागातील अधिकारी चक्रावून गेले. साहेब तुम्ही उठा आणि खुर्चीवर बसा, अशी विनवणी करतच अधिकाऱ्यांनी नगरसेवकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
श्रीपार्क सोसायटीचा पाणी प्रश्न आहे तिथे विद्युत पुरवठा खंडित झाला तर त्याठिकाणी समस्या निर्माण होते. त्या ठिकाणी पुणे मनपाकडून नवीन जलवाहिनी टाकली आहे. तिची चाचपणी शनिवारी करण्यात येणार आहे, त्यांनतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
– रमेश वाघमारे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग