पुणे – शहरात मागील पाच महिन्यांपासून थंडीचा कडाका कायम असून हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक ठरत असते. त्यामुळे स्वाईन फ्लू पुन्हा डोके वर काढण्याची भीती असताना बुधवारी (दि. 16) स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आला. दि. 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत दोन रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, दिवसभरात 2 हजार 925 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये 27 संशयीत व्यक्तींना टॅमीफ्लूच्या गोळ्या देऊन विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर दोन रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव यंदा पावसाळ्यामध्ये कमी झाल्याचे पाहायला मिळाले. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आला आहे. मात्र, मागील पंधरा ते वीस दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असल्यामुळे साथीच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक असते. त्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रूमाल बांधावा.
सर्दी, ताप, घसा, खोकला झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. आजार अंगावर न काढता गरज भासल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.