मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी जलीस अन्सारी बेपत्ता

मुंबई : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी जलीस अन्सारी हा बेपत्ता झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. जलीस अन्सारी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. डिसेंबर 2019 मध्ये तो 21 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. तो मुंबईतील अग्रीपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोमिनपूर या भागामध्ये राहणारा आहे. त्याच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. अजमेर येथील बॉम्बस्फोट आणि देशभरातील अनेक बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता.

जलीस अन्सारी बेपत्ता झाल्याचे कळताच महाराष्ट्र एटीएस आणि क्राईम ब्रॅंचने हाय अलर्ट जारी केला आहे. मुंबई पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, अजमेर येथे 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयने जलीस अन्सारी याला अटक केली होती. चौकशीमध्ये देशभरात झालेल्या 50 पेक्षा अधिक बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले होते. शुक्रवारी जलीस यांची पॅरोलची मुदत संपणार होती. मात्र गुरुवारी सकाळपासूनच तो बेपत्ता झाला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरोलवर असताना जलीस अन्सारी याला रोज सकाळी साडेदहा ते बाराच्या दरम्यान अग्रीपाडा पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले होते. मात्र गुरुवारी तो दिलेल्या वेळेमध्ये हजेरी लावण्यास आला नाही. त्यानंतर दुपारी अन्सारीचा 35 वर्षाचा मुलगा जैद अन्सारी पोलिस ठाण्यात आला आणि त्याने जलीस अन्सारी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये सांगितल्या प्रमाणे, गुरुवारी सकाळी नमाज अंदा करुन येतो असे सांगून जलीस अन्सारी घराबाहेर पडला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.