प्रशासनाचे दुर्लक्ष : वाहतूक पोलिसांचीही डोळ्यांवर पट्टी
पिंपरी (प्रतिनिधी) – अनधिकृत होर्डिंग हटविण्यासाठी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च करण्यात येतात. परंतु बहुतांश अनधिकृत फलकांना महापालिका अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद असल्याचे दिसून येते. त्यामुळेच शहरात चौकांना अनधिकृत फलकांचा विळखा पडलेला आहे. अनधिकृत फलक लावणारांवर कारवाई होत नसल्याने फुकट्या लोकांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रक सिग्नलच्या खांबावरही मोठ-मोठे फलक लावले जात आहेत. हा प्रकार निगडी प्राधिकरण येथील भेळ चौकात “प्रभात’ प्रतिनिधीला पाहणीदरम्यान दिसून आला.
भेळ चौकातील सिग्नलवर मागील काही दिवसांपासून अनधिकृत फलक लावले आहेत. या फलकांमुळे सिग्नलचे दिशादर्शक लाईटही वाहनचालकांना दिसत नाहीत. असे असताना महापालिका प्रशासन व वाहतूक पोलीस मात्र यावर कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाहीत. प्रशासनाच्या अशा गाफील भूमिकेमुळेच आज शहरात अनधिकृत फलकांना ऊत आला आहे. या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. या सर्व गोष्टींसाठी प्रशासनाच जबाबदार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत फलक नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी यापूर्वी अनेकदा आंदोलनेही झाली. मात्र, अद्यापही महापालिका प्रशासनाला अनधिकृत फलकांवर 100 टक्के कारवाई करता आलेली नाही. शहरातील अनधिकृत होर्डिंग किती हे मोजण्यासाठी महापालिकेने अनेकदा सर्वेक्षणही केले. त्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग असल्याचे वारंवार समोर आले. मागील वर्षी अनधिकृत फलकांवर कारवाईसाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली होती.
वाढीव निधी मिळाल्यानंतरही अद्याप शहरातील अनेक भागात अनधिकृत फलक जैसे थे राहिलेले आहेत. त्यामुळे, राजकीय नेते आणि महापालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने शहरात आजही अनधिकृत होर्डिंगचा धंदा जोरदारपणे सुरू आहे. मात्र, केवळ नोटीस बजावण्याचीच कारवाई होत असल्यामुळे आता अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांचे धाडसही वाढू लागले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य चौकाबरोबरच आता उपनगरातील महत्त्वाच्या ठिकाणीही अनधिकृत होर्डिंगचे जाळे पसरत चालले आहे.
निगडी प्राधिकरण येथील भेळ चौक परिसरातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावलेले आहेत. भेळ चौकामध्ये असणाऱ्या सिग्नलच्या खांबालाच मोठ-मोठे होर्डिंग लावण्याने सिग्नलची लाईटही वाहनचालकांना दिसत नाही. तसेच समोरील बाजूने वळणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून हे फलक दिमाखात उभे असताना परिसरातील वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासना अद्याप या होर्डिंगवर कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे, अनधिकृत होर्डिंग लावण्याला महापालिका कर्मचाऱ्यांचाच आशीर्वाद असून त्याला वाहतूक पोलीसही साथ देत असल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे.
अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा नुसता दिखावा
शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या प्रश्नावर अनेकदा राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आंदोलने केली आहेत. मात्र, अद्याप अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. अनधिकृत होर्डिंगला राजकीय नेत्यांबरोबरच महापालिका अधिकारी आणि कर्मचारीही पाठबळ देत असल्याने हा प्रश्न शहराच्या मानगुटीवर बसला आहे.