वाई – वाई तालुक्यातील वहागाव येथील सोने खरेदीसाठी निघालेल्या जाधव कुटुंबियांजवळील एक लाख वीस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकराणी वाई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, वहागाव येथील विठ्ठल जाधव हे पत्नी सौ. अंजना जाधव व मुलगी चित्रा जाधव यांना घेऊन सोने खरेदीसाठी निघाले होते. जाधव कुटुंबिय हे शुक्रवारी सकाळी प्रथम सुरुर येथील जिल्हा बॅंकेत आले. त्याठिकाणी विठ्ठल जाधव यांनी त्यांच्या खात्यातून 70 हजार आणि मुलीच्या खात्यातील 50 हजार असे एकूण एक लाख वीज हजार रुपये काढले. हे पैसे पर्समध्ये ठेवून ती पर्स मुलगी चित्रा हिच्या सॅकमध्ये ठेवली.
त्यानंतर जाधव कुटुंबिय वाई शहरातील धर्मपुरी याठिकाणी असणाऱ्या विलासराव ओसवाल यांच्या दुकानात सोने खरेदीसाठी आले. याठिकाणी दागिने पाहण्यात गर्क असताना आधीच जाधव कुटुंबियावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी नकळतपणे चित्रा हिच्या सॅकमधील पैसे असणारी पर्स चोरून पोबारा केला. दागिने खरेदी करुन झाल्यानंतर पैसे देण्यासाठी सॅक उघडली असता सॅकमध्ये पैसे ठेवलेली पर्सच नसल्याचे जाधव कुटुंबियांच्या लक्षात आला. याप्रकरणी जाधव कुटुंबियांनी या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.