जामखेड – “दादा, आता संक्रांत जवळ आलीये, तर वहिनींसाठी एक साडी घेऊनच जा! असा आग्रह विद्यार्थ्यांनी केला अन् आमदार रोहित पवार यांनी आपल्या पत्नीसाठी चक्क चिमुरड्यांकडून साडी खरेदी केल्याने मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. निमित्त होते फक्राबाद (ता. जामखेड) येथील जि. प. शाळेच्या आनंदी बाजाराचे. महाराजस्व अभियानाच्या बैठकीला जात असताना आमदार पवार यांनी नुकतीच या शाळेस अचानक भेट दिली होती.
विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व्हावे, अभ्यासाबरोबरच त्यांना गणित, नफा-तोटा या दैनंदिन बाबींचे आकलन व्हावे, हा उद्देश ठेवून जि. प. शाळेच्या वतीने आनंदी बाजार भरवण्यात आला होता. या बाजारात विविध पदार्थ, खेळण्यांचे, खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.
यावेळी आमदार पवार यांनी बाजारात विक्रीला ठेवलेल्या अनेक खाद्यपदार्थांची चव चाखली. विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने आमदार पवार यांना घास भरवले. काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ ठेवले होते. अगदी लहान होऊन पवार यांनी या खेळांमध्ये सहभाग घेतला. आमदार असून, देखील मुलांमध्ये खेळणे, गप्पा मारणे हे सर्व पाहून मुले आनंदात आपले भान हरपून गेले होते.
“मार्केटिंग स्कील’ला दाद!
कोणताही व्यवसाय करताना उत्पादित केलेल्या वस्तूचे मार्केटिंग करता आले पाहिजे. मार्केटिंगची कुशलता असली व्यवसाय यशस्वी होऊ शकतात.शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या स्कीलच्या जोरावर उत्कृष्ट मार्केटिंग केले. हा त्यांच्यातील गुण कौतुक करण्यासारखा आहे, असे मत रोहित पवार यांनी बोलताना व्यक्त केले.