नवी दिल्ली : दिल्लीत 2012 मध्ये घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील फाशी ठेठावलेल्या आरोपींनी दाखल केलेल्या दुरूस्ती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (दि. 14) सुनावणी होणार आहे.
न्या. एनव्ही रमणा, अरूण मिश्रा, आरएफ नरीमन, आर. भानुमथी, आणि अशोक भुषण यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या विनय शर्मा आणि मुकेश या दोघांनी ही याचिका दाखल केली आहे.
ही दुरूस्ती याचिका हे आरोपींच्या बचावाचा अंतीम मार्ग आहे. फेरविचार याचिका दाखल फेटाळल्यानंतर त्यांनी हा मार्ग अनुसरला होता. जर ही याचिका फेटाळली गेली तर राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करता येऊ शकेल.
मुकेश (32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंह (31) या आरोपींवर दिल्ली न्यायलयाने 22 जानेवारीला सात वाजता फाशी द्यावी म्हणून डेथ वॉरंट काढले आहे. निर्भया या 23 वर्षीय पॅरीमेडिकल विद्यार्थीनीवर 16 डिसेंबरच्या मध्यरात्री सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी निर्घृण मारहाण केली. निर्भयाचा उपचार सुरू असताना 29 डिसेंबर 2012 रोजी सिंगापूरमध्ये मृत्यू झाला.
या प्रकरणात सहा जणांना दोषी ठरवण्यात आले. त्यातील एकाने कारागृहात आत्महत्या केली. एका अल्पवयीनाने तीन वर्ष सुधारगृहात काढल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.