नवी दिल्ली : संरक्षण दलांचे पहिले प्रमुख (चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ, सीडीएस) म्हणून जनरल बिपीन रावत यांची निवड करण्यात आली. बिपीन रावत हे भारतीय लष्कराचे मावळते प्रमुख आहेत.
लष्करप्रमुख म्हणून त्यांनी 31 डिसेंबर 2016 रोजी पदभार स्वीकारला होता.
संरक्षण दल प्रमुखांचा लष्करप्रमुख, हवाई दल प्रमुख आणि नौदलप्रमुख यांच्या समकक्ष दर्जा असेल. त्यांना चार तारांकीत मानांकन असेल. तीनही लष्करी दलांच्या प्रमुखांपेक्षा त्यांचे पद राजशिष्टाचारात एक स्थान पुढे असेल. ते तीनही दलांसाठी निधीची उभारणी आणि उत्तम व्यवस्थापन याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. ते 65 वर्षापर्यंत या पदावर राहू शकतील.
संरक्षण मंत्रालयाने या पदाला मान्यता देताना त्या पदाची वयोमर्यादा रविवारी 65 पर्यंत वाढवली. या तीनही दलातील कोणात्याही एका प्रमुखाची या पदावर निवड करता येऊ शकेल. मात्र या पदाचा कार्यकाळ अद्याप निश्चित करण्यात आला नाही.
या पदाची निर्मिती करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने मंगळवारी घेतला होता. या पदावरील व्यक्ती ही संरक्षण मंत्र्यांची प्रमुख सल्लागार असेल.