बालासोर, (ओडिशा) – तब्बल 400 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्रह्मोस या सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली.
ओडिशातील चंडीपूर येथील ‘इंटिग्रेटेड टेस्ट रेंज’वरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आणि ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरल्याचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात ‘डीआरडीओ’च्या सूत्रांनी सांगितले.
स्वदेशी क्षमता वाढवण्यासाठीचे हे आणखी एक मोठे पाऊल आहे. स्वदेशी बूस्टर आणि एअरफ्रेम सेक्शन असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र इतर अनेक ‘मेड इन इंडिया’ उप-यंत्रणांनी युक्त आहे.
चाचणीदरम्यान निश्चित करण्यात आलेले सर्व निकष ब्रह्मोसने व्यवस्थित पाळले, असे ‘डीआरडीओ’च्या अधिकाऱ्यांनी क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर सांगितले. ब्रह्मोस क्षेपणास्त्र जमिनीवरून, समुद्रातील प्लॅटफॉर्मवरून तसेच लढाऊ विमानांवरूनही डागता येऊ शकणार आहे.
ब्रह्मोस क्षेपणस्त्राच्या पूर्णक्षमतेची 450 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची चाचणी 11 मार्च 2017 रोजीच घेण्यात आली आहे. तर 30 सप्टेंबर 2019 रोजी लघुपल्ल्याची जमिनीवरील चाचणी घेण्यात आली होती.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ‘डीआरडीओ’ आणि रशियातील आघाडीची अंतराळ संशोधन संस्था ‘एनपीओएम’ने मिळून संयुक्तपणे केली आहे. ब्रह्मोस हे मध्यम पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्र असून पाणबुड्या, युद्धनौका आणि जमिनीवरूनही हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकणार आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र सध्या भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये समविष्ट असून सध्या तरी जगभरातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते आहे, असे सूत्रांनी सांगितले.
संरक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या अभियानासाठी ‘डीआरडीओ’ कर्मचाऱ्यांचे आणि टीम ब्रह्मोसचे अभिनंदन केले. डीडी आर अँड डी चे सचिव आणि डीआरडीओचे चेअरमन डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी या कामगिरीबद्दल वैज्ञानिक समुदायाचे अभिनंदन केले.
आजच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आत्मनिर्भर भारताचा संकल्प साकार करत शक्तिशाली ब्रह्मोस शस्त्रास्त्र प्रणालीसाठी स्वदेशी बूस्टर आणि इतर स्वदेशी घटकांच्या उत्पादन मालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.