मुंबई – ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर होत असून राजभवनात ३६ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर आदित्य ठाकरेंचीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्व मंत्र्यांना गोपनियतेची शपथ देत आहेत. यावेळी मात्र अक्कलकुवा मतदारसंघातील काँग्रेस नेते अॅड. केसी पाडवी यांच्या शपथविधीवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चिडल्याचे पाहायला मिळाले. शपथविधी पूर्ण झाल्यानंतर पाडवींनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. त्यावेळी, राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना बोलावून दुसऱ्यांदा शपथ घ्यायला लावली. ठरवून दिलेल्या मजकूराव्यतिरिक्त काहीही बोलायचं नाही, असेही कोश्यारी यांनी ठणकावून सांगितले.