कराड (प्रतिनिधी) – उंब्रज ते पाटण या मुख्य मार्गावर ऊस वाहतूक ट्रॅक्टर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक ठरु लागली आहे.
सध्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरु झाला असून कारखान्यास आवश्यक असणाऱ्या ऊसाची वाहतूक ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत आहे. मात्र उसाची वाहतूक करताना वाहनधारकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. याचा गांभीर्याने विचार करुन पोलीस प्रशासन व कारखाना व्यवस्थापन यांनी संयुक्तपणे कार्यवाही करणे आवश्यक आहे, असा सूर प्रवाशांमधून उमटत आहे.
सदरच्या ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक केली जात आहे. त्यामुळे ट्रॉलीमध्ये भरण्यात आलेला ऊस हा धोकादायकरित्या रस्त्यावर तसेच वाहनांवर पडण्याची दाट शक्यता असल्याने अपघात होण्याचा धोका संभवतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन संबंधितांना सूचना द्याव्यात. अशीही मागणी प्रवाशांमधून होत आहे.