नववर्ष स्वागतासाठी चोख बंदोबस्त; ब्रेथ ऍनालायझरचा होणार वापर
सातारा (प्रतिनिधी) – सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असताना हुल्लडबाजी व अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी मद्यपींवर करडी नजर ठेवण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदीसह “फिक्स पॉइंट’वरील बंदोबस्तात वाढ केली आहे. ब्रेथ ऍनालायझरने वाहनचालकांची तपासणी करून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.
नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली असून त्यासाठी रंगीतसंगीत नियोजन सुरू आहे. थंडीचे वातावरण असल्याने अधिक जोशात असलेल्या तरुणाईने हॉटेल्समध्ये जेवणासह मद्यपानाचेही बेत आखले आहेत. शहरातील हॉटेल, बिअर बार, परमिट रूम, ढाबेचालकांनीही खवय्यांना व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीच्या दरात भोजन व पार्ट्यांची व्यवस्था केली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या या पार्ट्यांमध्ये सहभागी होण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. या पार्ट्यांमध्ये वाद, भांडणे होतात. पार्टी करून घरी परतताना मद्याच्या नशेत असलेल्या वाहनचालकांमुळे अपघात होतात. यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पोलीस नाकाबंदी, वाहन तपासणी मोहीम राबवणार आहे.
कायदा मोडल्यास कारवाई होणार
नववर्षाचे स्वागत जल्लोषात, पण अनुचित प्रकारांशिवाय व्हावे. मद्यपान करून वाहन चालवणे, रस्त्यावर वेड्यावाकड्या गाड्या चालवणे, असे प्रकार घडू नयेत, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायद्याचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.