नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाज माध्यमांमधून सतत व्यक्त होताना आपण पाहतो. सोशल मीडियाच्या वापरामुळेच पंतप्रधान मोदी हे तरुणाईच्या व नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनल्याचे देखील आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळाले आहे. आजही पंतप्रधानांच्या सोशल मीडियावरील अशाच एका कृतीमुळे त्यांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. त्याचं झालं असं की, आज कंकणाकृती सूर्यग्रहण बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या रंगाचा गॉगल परिधान केला होता. मोदींचा हा काळ्या रंगाच्या गॉगलमधील फोटो अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मोदींचा हा फोटो हाती लागताच नेटकऱ्यांनी लगेचच त्याच्या मिम्स (विडंबन चित्र) तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केल्या.
गप्पिस्तान रेडिओ नावाच्या एका युजरने मोदींच्या ‘त्या’ फोटोचा वापर सोशल मीडियावर मिम बनवण्यासाठी केला जात असल्याचं ट्विट केलं. यानंतर मोदींनी स्वतः गप्पिस्तान रेडिओचे ते ट्विट रिट्विट करत “Most welcome….enjoy :)” असा संदेश लिहिला. अशा प्रकारचे विडंबनात्मक मिम्स शेअर केल्यानंतर काही नेतेमंडळींनी पोलीस कारवाई केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरील या मीम गेमला खिलाडूवृत्तीने स्वीकारल्याने त्यांची नेटकऱ्यांनी वाहवाह केली आहे. नेटकरी सध्या #CoolestPM हा हॅशटॅग वापरून मोदींच्या कृतीची प्रशंसा करत असल्याने हा हॅशटॅग ट्रेंडिंग झाला आहे.