नवी दिल्ली :आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमचा हस्तक फारुक टकला याच्याविरोधात सीबीआयने बनावट पासपोर्ट प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.
मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर कायद्यापासून वाचण्यासाठी त्याने ओळखीचा पुरावा म्हणून हा बनावट पासपोर्ट वापरला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. फारुख टकलाचे खरे नाव मोहम्मद फारुख असे आहे. त्याला 8 मार्च 2018 रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले होते.
एअर इंडियाच्या विमानाने तो दुबईवरून येणार असल्याची माहिती मिळाल्यावर सीबीआयने त्याला अटक केली होती, असे सूत्रांनी सांगितले. अटक झाली तेंव्हा फारुख टकलाकडे “जे 6435628′ क्रमांकाचा पासपोर्ट होता. या पासपोर्टवर मुश्ताक मोहम्मद मिलान, असे नाव होते.
फारुखने 1991 मध्येच मुश्ताक या बनावट नावाने मुंबईतून पासपोट मिळवला होता, असे सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. दुबई आणि आखातातील अन्य शहरांमध्ये राहण्यासाठी त्याने हा बनावट पासपोर्ट वापरला होता. त्यानेच 1993 च्या बॉम्बस्फोटांसाठी दाऊदबरोबर काम केले आणि त्याला मदतही केली होती. बॉम्बस्फोटांनंतर 1995 मध्ये इंटरपोलने त्याच्याविरोधात “रेड कॉर्नर’नोटीसही बजावली होती.
मात्र बनावट पासपोर्टमुळे तो हाताला लागला नव्हता. 2001 मध्ये त्याने दुबईतील भारताच्या वाणिज्य दूतावासातून पासपोर्ट नुतनीकरणही केले होते. 2011 साली याच बनावट पासपोर्टच्या आधारे दिल्लीत आल्यावर त्याला अटक करण्यात आली होती.
त्याने अन्य चौघांच्या विमान प्रवासाची आणि दुबईमध्ये राहण्याची व्यवस्थाही केली होती. मुंबईतील बॉम्बस्फोटांसाठी काही जणांचा पाकिस्तानातील प्रवास आणि मुंबईला परत येण्यासाठीच्या पैशाची व्यवस्थाही त्याने केली होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी बॉम्बस्फोट प्रकरणी फारुखला फरार आरोपी घोषित केले होते.