पुणे – मार्गशीर्ष दर्श अमावस्या म्हणजेच 26 डिसेंबर 2019 तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजेच 2010 सालानंतर कंकणाकृति सूर्यग्रहणाचा अविष्कार नभांगणात दिसत आहे.
आज सकाळी 8 ते 11.30 या वेळेत हे ग्रहण दिसणार आहे. सूर्योदयाच्या वेळेस हे ग्रहण सौदी अरेबिया मध्ये सुरू होत असून तिथून चंद्राची सावली पृथ्वीवर पडण्यास सुरूवात झाली. ही सावली सकाळी 8 च्या सुमारास सौदी अरेबिया, कतार, ओमानमधून भारतात आली. चंद्राची 120 किलोमीटर रूंदीची दाट छाया केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूतून प्रवास करून श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूरमार्गे सूर्यास्तास प्रशांत महासागरात पोहोचला. चंद्राची सावली जवळजवळ 13000 किलोमीटर लांबीचा प्रवास साडे तीन तासात पूर्ण करेल.
तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करा
सूर्यग्रहण असो वा नसो, सूर्याकडे थेट उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक आहे. सूर्यग्रहण पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित सोलर फिल्टर्स असलेले चष्मे घालण्याचा किंवा प्रोजेक्शन पद्धत वापरून सूर्यग्रहण पाहण्याचा आग्रह धरा. सुरक्षित सौर चष्मे किंवा तज्ज्ञांनी सूचवलेल्या सुरक्षित पद्धतीनेच कुणीही, कोणत्याही ठिकाणावरून सूर्यग्रहणाचा आनंद लुटू शकतो, यात शंका नाही.
भौगोलिक स्थानानुसार सूर्याच्या ग्रहणाची तुम्हाला दिसणारी स्थिती अवलंबून असते. तुम्ही भारतात कोणत्या ठिकाणी राहता त्यावर तुम्हाला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार का खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार हे अवलंबून आहे.
महाराष्ट्रातील निवडक ठिकाणच्या खंडग्रास सूर्यग्रहण स्थिती :
पुणे 78%, मुंबई 79%, सोलापूर 81%, कोल्हापूर 84%, नाशिक 74%, नागपूर 62%, जळगाव 68%, औरंगाबाद 74%, अकोला 68%.