ट्रेनचे दोन संच होणार रविवारी दाखल; वल्लभनगर ते कासारवाडी दरम्यान धावणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवडसह पुण्यात मेट्रोच्या कामाने गती घेतली असून, येत्या रविवारी (दि. 29) मेट्रोच्या ट्रेनचे दोन संच शहरात दाखल होणार आहेत. नागपूरहून ट्रेनचे संच ट्रकद्वारे आज पाठविण्यात आले आहेत. हे संच दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर ते कासारवाडीदरम्यान चाचणीसाठीची शहरातील पहिली मेट्रो धावणार आहे.
पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. दोन्ही शहरातील मेट्रोचा पहिला पिलर वल्लभनगर येथे उभारण्यात आला होता. तर मेट्रोचे पहिले स्थानक होण्याचा मानही वल्लभनगरलाच मिळणार आहे. वल्लभनगर, कासारवाडी आणि फुगेवाडी येथील मेट्रोच्या स्थानकाची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.
पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान मेट्रोचे रुळ तयार झाले असून, विजेचे पोल उभरण्याचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या मार्गावर चाचणीसाठीची पहिली ट्रेन कधी धावणार? हा प्रश्न आज (रविवार) निकाली निघाला आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड शहरात धावणाऱ्या मेट्रोचे दोन संच नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या दोन ट्रकचे प्रस्थान झाले आहे. सहा दिवसांचा प्रवास करून हे ट्रक येत्या रविवारी शहरात पोहोचतील. त्यानंतर चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.
डिसेंबरची “डेडलाइन’ चुकणार
डिसेंबरअखेर महामेट्रोच्या वतीने चाचणी ट्रेन सुरू केली जाईल, अशी घोषणा महामेट्रोचे महाव्यवस्थापक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत केली होती. मात्र, नागपूरहून निघालेल्या ट्रेन 29 डिसेंबर रोजी शहरात पोहोचणार आहेत. त्यानंतर या मेट्रो उन्नत मार्गावर चढविण्यासाठी दहा पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याने डिसेंबरची जाहीर करण्यात आलेली डेडलाइन चुकणार आहे. नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात मेट्रोची चाचणी सुरू होईल, असा आशावाद निर्माण झाला आहे.
स्टेनलेस स्टीलपासून निर्मिती
मेट्रोसाठी तयार करण्यात आलेले कोच हे पूर्णत: स्टेनलेस स्टिलच्या धातूपासून बनविण्यात आलेले आहेत. वजनाला अत्यंत हलके डबे असल्यामुळे ट्रेनचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. मेट्रोचा अधिकतम वेग हा ताशी 90 किलोमीटर असणार आहे. तर मेट्रोची पहिली चाचणी ही पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर ते कासारवाडी, फुगेवाडी दरम्यानच होण्याची शक्यता आहे.
असे असणार कोच
मेट्रोच्या प्रत्येक संचामध्ये तीन कोच असणार आहेत. एका ट्रेनमध्ये (तीन कोच) 950 ते 970 इतके प्रवासी प्रवास करू शकतील. तीनपैकी एक कोच महिलांसाठी राखीव असणार असून, दोन कोच हे सर्वांसाठी खुले राहणार आहेत. तीनही कोच एकमेकांशी जोडलेले असणार आहेत. एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये सहजगत्या जाता येणार असून, संपूर्ण ट्रेन ही वातानुकूलीत असणार आहे. आजच्या युगातील अत्याधुनिक सोयीसुविधा या ट्रेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक कोचमध्ये मोबाइल, लॅपटॉपसाठी चार्जिंगची सुविधा देण्यात आली असून, आधुनिक पद्धतीचे एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. बाहेरील प्रकाशावर हे दिवे स्वत:चा प्रकाश कमी-जास्त करणार आहेत.