कामशेत – शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व लहान मुलांवर होणारे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शाळेतील लहान मुलांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करण्याच्यासाठी पोलीस उपअधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस दत्तक योजना सुरू केली आहे.
पोलीस दत्तक योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेसाठी एका पोलिसाची नेमणूक करण्यात आली आहे, ज्या पोलीस कर्मचाऱ्याकडे जी शाळा दिली आहे. त्या शाळेतील प्रत्येक मुलाकडे त्या शाळेसाठी नेमण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा संपर्क क्रमांक देण्यात येणार असून, त्यांना कोणी त्रास देत असेल किंवा त्यांच्या परिसरात कोणत्याही चुकीच्या घटना घडत असल्यास विध्यार्थ्यानी याची माहिती पोलिसांना देऊन घडणाऱ्या अन्यायाची माहिती पोलिसांपर्यंत पोहचू शकेल.
तसेच ज्या पोलीस कर्मचाऱ्याकडे जी शाळा दत्तक दिली आहे, त्यांनी त्या शाळेत जाऊन मुलांशी संवाद साधून त्यांना गुड टच, बॅड टच, छेडछाड, भांडणे व गुन्हेगारी विषयी माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांच्या मनात पोलिसांविषयीची भीती कमी होईल. पोलीस आपल्या सुरक्षिततेसाठी असून, आपण चुकीचे वर्तन केल्यास ते आल्यावर कारवाई देखील करतील, अशी भावना लहान मुलांच्या मनात रुजविण्याचा नवनीत कावत यांचा उद्देश आहे.
पोलीस दत्तक योजनेमध्ये पोलीस कर्मचारी यांचे शाळेत वारंवार जा-ये असल्याने रोडरोमिओंना आळा बसण्यास मदत होईल. पोलिसांना विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार आल्याने बाल लैंगिक अत्याचार रोखण्यास मदत होणार आहे. यासाठी पोलीस उपअधीक्षक नवनीत कावत यांनी गुरुवारी सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांची बैठक घेऊन पोलीस दत्तक योजनेची माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांविषयी भीती असल्याने भीतीमुळे त्यांच्या सोबत घडणाऱ्या चुकीच्या घटना ते कोणाला सांगत नसल्याने त्यांच्या सोबत घडणाऱ्या छोट्या गुन्ह्यांचे रुपांतर मोठ्या गुन्ह्यात होते व हे रोखण्यासाठी व लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी ही योजना राबवित आहोत.
– नवनीत कावत, पोलीस उपअधीक्षक, लोणावळा विभाग.