आंध्र पोलिसांची कारवाई: नौदलाच्या 7 कर्मचाऱ्यांना अटक
अमरावती : पाकिस्तानशी लागेबांधे असणारे आणि हेरगिरीत गुंतलेले रॅकेट उघड केल्याचा दावा आंध्रप्रदेश पोलिसांनी शुक्रवारी केला. त्या रॅकेटचा भाग असणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये भारतीय नौदलाच्या 7 कर्मचाऱ्यांचा आणि एका हवाला ऑपरेटरचा समावेश आहे.
आंध्र आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयातून हेरगिरी रॅकेटमध्ये सामील असणाऱ्यांपर्यंत पोहचण्यात आंध्र पोलिसांना यश आले. त्या रॅकेटच्या सदस्यांना देशाच्या विविध भागांतून अटक करण्यात आली. हेरगिरी रॅकेटमध्ये सामील असल्याच्या संशयावरून आणखी काही जण रडारवर आहेत.
मात्र, त्या कारवाईचा अधिक तपशील आंध्र पोलिसांनी उघड केला नाही. अटक करण्यात आलेल्यांची ओळखही जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांना विजयवाडामधील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्यांना 3 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली. संबंधित प्रकरणात आणखी काही जणांची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.