सीईटी सेलने केले स्पष्ट : “पीसीएम’ आणि “पीसीबी’ साठीच परीक्षा होणार
पुणे – इंजिनिअरिंग, फार्मसी व कृषी या पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेली “एमएचटी सीईटी’ या प्रवेश परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीनेच प्रसिद्ध केला जाणार असल्याचे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले.
मागील निकालात पर्सेंटाईलवरून झालेला गोंधळ टाळण्यासाठी यावेळी परीक्षेतून पीसीएमबी ग्रुप वगळण्यात आला असून केवळ पीसीएम आणि पीसीबी या दोन ग्रुपसाठीच परीक्षा होणार आहे. त्यामुळे पर्सेंटाईलचा गोंधळ कमी होण्याची चिन्हे आहेत.
राज्य सीईटी सेलने “एमएचटी सीईटी’ या परीक्षेची गुणदान पद्धत आणि अभ्यासक्रम नुकतेच प्रसिद्ध केले. त्यानुसार यापुढच्या सीईटी परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीनेच लावले जाणार असल्याचे जाहीर केले. यंदा सीईटीची ऑनलाइन परीक्षा दि. 13 ते 17 एप्रिल आणि दि. 20 ते 23 एप्रिल या तारखेला होणार आहे.
सीईटीचा अभ्यासक्रम व गुणांची पद्धत
सीईटीचा अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यापैकी 20 टक्के प्रश्न अकरावीतील तर 80 टक्के प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमातील असतील. गणित विषयाची परीक्षेत 50 प्रश्न असून प्रत्येकी दोन गुण असतील. तर भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासाठी प्रत्येकी 50 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे दोन्ही विषयांची परीक्षा 100 गुणांची राहील. जीवशास्त्रामध्ये वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्राला प्रत्येकी 50 गुण असतील. प्रत्येक प्रश्न एक गुणांचा राहील. तीनही विषयांसाठी प्रत्येकी 90 मिनिटांचा वेळ देण्यात येईल व परीक्षेसाठी निगेटिव्ह पद्धत नसेल.
गेल्या वर्षी एमएचटी-सीईटीचा निकाल चुकीच्या पद्धतीने पर्सेंटाईलनुसार जाहीर केला. त्यामुळे गोंधळ उडाला होता. आता पीसीएमबी ग्रुप वगळण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या सीईटीचा निकालात पर्सेंटाईलचा गोंधळ होणार नाही. पर्सेंटाईल ही पद्धत राष्ट्रीय स्तरावरील योग्य दर्जाची असून त्यानुसार निकाल जाहीर करणे आवश्यक आहे.
– प्रा. दुर्गेश मंगेशकर, संचालक आयआयटीन्स प्रशिक्षण संस्था