रशियन वैमानिकांना भारतीय ‘तेजस’ची भुरळ

प्रथमच एका विदेशी वैमानिकाने केले उड्डाण


विमानातील उड्डाण एक विलक्षण अनुभव असल्याची व्यक्‍त केली भावना

पुणे – “भारतीय बनावटीचे आणि वजनाने अतिशय हलके असे “तेजस’ या लढाऊ विमानातून प्रथमच एका विदेशी वैमानिकाने उड्डाण केले. रशियन हवाई दलाचे अधिकारी लेफ्टनंट कर्नल नेस्त्रेव्ह ऍन्ड्रे यांनी पुण्यातील लोहगाव हवाई दल केंद्र येथून “एलसीए’ तेजसमधून उड्डाण केले. या विमानातील उड्डाण हा एक विलक्षण अनुभव होता, अशी भावना त्यांनी व्यक्‍त केली.

भारत आणि रशिया यांच्यादरम्यान झालेल्या इंद्र या संयुक्‍त लष्करी सरावादरम्यान लेफ्टनंट कर्नल ऍन्ड्रे यांनी हे उड्डाण केले. या उड्डाणादरम्यान त्यांना भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन प्रोमीत बोस यांनी संगत केली. लेफ्ट. कर्नल ऍन्ड्रे हे रशियाच्या हवाईदलातील अतिशय अनुभवी वैमानिक आहेत. त्यांनी मिग-21, सुखोई-35 अशा अत्याधुनिक विमानांतून उड्डाणांचे विविध विक्रम स्वत:च्या नावावर नोंदविले आहेत.

तेजसमधील उड्डाणाचा अनुभव माध्यमांशी व्यक्‍त करताना कर्नल ऍन्ड्रे म्हणाले, “रशियामध्ये एक म्हण आहे “जे विमान चांगले दिसते, तेच चांगले कार्य करते’, भारताच्या “तेजस’ने ही म्हण सार्थ करून दाखविली आहे. अत्यंत कमी वजनाच्या, लहान परंतु सुटसुटीत अशा “तेजस’ विमानातून उड्डाण करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. तेजसची रचना अतिशय सुरेख आहे. यात बसविण्यात आलेल्या यंत्रणा चांगल्या दर्जाच्या असून, समजण्यासही अतिशय सोप्या आहेत. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकाला विमानातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्‍त ठरणारी “इजेक्‍शन सीट’ ही आरामदायी आहे. तसेच हे विमान चालवताना नियंत्रित करणे सोपे ठरते.’

“तेजस’ या विमानातील उड्डाणाचा अनुभव अतिशय चांगला होता. त्यामुळेच मला या विमानातून पुन्हा एकदा उड्डाण करण्याबरोबरच “सुखोई’ आणि “तेजस’ यांच्यामध्ये “डॉगफाइट’ खेळण्यासदेखील आवडेल, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.