नगर – जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापतींची मुदत शुक्रवारी,दि.20 रोजी संपत आहे. शासनाच्या आदेशानुसार 20 नंतर निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रक्रियेला किमान दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याने या काळात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक नेमले जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निर्देशानुसार 20 डिसेंबरला मुदत संपत असल्याने 21 डिसेंबरला सदर निवडींचा कार्यक्रम जाहीर केला होता.मात्र शासनाने दुसऱ्याच दिवशी 20 नंतर निवड प्रक्रिया राबविण्याचा नव्याने अध्यादेश काढल्याने आता त्या नेमक्या कोणत्या तारखेला घेण्यात येणार याची तारीख प्रशासनाने निश्चित न केल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर शासकीय नियमानुसार प्रशासक येणार हे उघड आहे.
दरम्यान,जिल्हा प्रशासनाने 20 तारखेला मुदत संपताच 21 तारखेला सदर निवडीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांना निवडणूक कार्यक्रमाच्या नोटीसा पाठविण्यात येणार आहेत. यात जिल्हा परिषदेसाठी दहा तर पंचायत समितीसाठी सात दिवसांचा कालावधी बंधनकारक असतो. त्या कालावधीच्या नंतर निवडणुका घ्याव्या लागतात. त्यामुळे या निवडी आता नव्या वर्षातच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.