शहरातून मागणी; दर चांगला असल्याने आर्थिक उत्पन्न
निमसाखर (वार्ताहर) – निमसाखर (ता. इंदापूर) परिसरामध्ये गोड, आंबट गावरान बोरांची झाडे मोठ्या प्रमाणात असून बांधाकडेला, गावात आडरानाला आलेल्या अशा झाडांच्या माध्यमातून शेतकरी तसेच बरोजगार तरूणांना चांगले उत्पन्न मिळत आहे. एक झाड फळं तोडायला दिले तर सिझन संपेपर्यंत कमीत कमी 20 आणि बहर चांगला असेल तर 25 हजार रूपयेही मिळवून देवू शकते, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
पुणे, मुंबई या सारख्या शहरी बाजारातून गावरान बोरांना मोठी मागणी असल्याने आंबट, चिंबट बोरांतून हजारो रूपये मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधान आहे. इंदापूर तालुक्यात जिरायती क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. यामुळे काही फळांसाठी येथील जमीन तसेच वातावरण पोषक ठरत असते. याच कारणातून डाळींब, सिताफळा सारखे फळ पिक येथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यानुसार इंदापुरातील ग्रामीण भागात शेताच्या बांधावर, विहिरीच्याकडेला तसेच आडरानावर मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या गावरान बोरांच्या झाडांना येणाऱ्या बोरांचीही चव वेगळी ठरत आहे.
नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला असताना रब्बी तसेच खरीपातील पिकंही हातची गेली आहे. दुधासारखा पुरक व्यावसायही अडणीचा ठरू लागला आहे, अशावेळी आडबाजुला आणि दुर्लक्षीत राहिलेली गावरान बोरांची झाडेच आता शेतकऱ्यांच्या मदतीला येत आहेत.
10 किलोच्या पोत्याला 2500 रूपये भाव…
जुन, जुलै महिन्यांत गावरान बोरांच्या झाडांना मोहर येत असतो. सध्या, ही झाडे बोरांनी जोखाडली असुन एका बहराला किंमान एक दोन पोती बोर निघत आहेत. दहा किलोच्या पोत्याला 2000 ते 2500 रूपये भाव मिळत आहे. आठवड्याभरात बहर येत असल्याने यातून चांगले उत्पन्न मिळत असून हा बहर मकरसंक्रांतीपर्यंत कायम राहतो तर फेब्रुवारीच्या अखेर पर्यंत कमी होतो. त्यामुळे पुढील दोन महिन्यात शेतकऱ्यांना बोरापासून चांगले उत्पन्न मिळणार आहे.