मुल सज्ञान होईपर्यंत खाते पालक चालवितात
पुणे – पालकांप्रमाणेच मुलांच्या नावेही डिमॅट खाते उघडता येते व या खात्यामधून शेअर्स, डिबेंचर्स, म्युच्यूअल फंडाचे व्यवहार करता येतात. मुल सज्ञान होईपर्यंत हे खाते पालकांनी चालविणे अपेक्षित असते.
सेबीने यासंदर्भात अगोदरच परवानगी दिलेली आहे. 18 वर्षांखालील मुलांच्या नावे डिमॅट खाते काढले तरी त्यांना ते चालविता येत नाही. ते खाते मुलांच्या वतीने पालक चालविणे अपेक्षित आहे. पालक म्हणजे आई-वडील किंवा न्यायालयाने नेमून दिलेले पालक होय.
नियमित डिमॅट खाते उघडण्यासारखीच मुलांच्या नावे खाते उघडण्याची प्रक्रिया आहे. मुलांसाठीच्या डिमॅट खात्यासाठीचा अर्ज भरताना पालकांबरोबर मुलांचे केवायसी घेतले जाते. त्यामुळे दोघांची ओळख आणि पत्ता समजला जातो. सर्व कागदपत्रांवर पालकांची स्वाक्षरी लागते. यामुळे मुलांसह पालकांचे पॅन कार्ड सादर करावे लागते. मुलांच्या नावावर असलेले डिमॅट खाते संयुक्त खाते असू शकत नाही. या खात्यातून इंट्राडे ट्रेडिंग करता येऊ शकत नाही.